Tuesday, 28 April 2015

दादरा मी पुसता पुसता...

फराफरा बादली, पुढ्यात घेऊन,
जमीन पुसली वाकून, 
का करते मी ही कामं ?
शिकली नाही म्हनून.
लेक जिथे शिकते, 
त्याचा दादरा वाकुन पुसते.
वंगाळ नाही वाटत तिला - 
"ही माझी आई" सर्व्यांना सांगते.
 मलाच तवा भरुन येते, 
मग तिची मैतरीन होते,
दोन दादरे अधिक पुसते. 
येता जाता सर्वे देतात मला मान,
लेकीचा पैला नंबर ताठ माझी मान. 
हळूच तिच्या पायाखालची जमीन पुसते,
डोळ्यातलं पानी लपवत, 
कमरेत मी वाकत असते !

No comments:

Post a Comment