Friday, 22 May 2015

वेदनांची शिदोरी

सहज तिच्या पदराला 
हात लागला माझा 
झटका बसला तसा 
हात खाली आला. 
असंख्य मुंग्या तिच्या पदराला 
कडकडून चावा घेतला माझा. 
वेदनांची शिदोरी 
तिच्या पदरातही !
अनुभवली 
भर रस्त्यात 
घामाच्या दरवळीने 
मस्तक भणभणले 
थांबव अती तुझी वणवण 
मन माझे चिंतारले 
चावणार्‍या धावणार्‍या 
लाल - काळ्या त्या 
त्यांनी विणलेला 
आयुष्याचा शेला  
शेला कसला, ती आहे 
वेदनांची जाळी 
अजुनही जपली आहे 
पुस्तकातील पिंपळपानासारखी. 

Friday, 15 May 2015

लुडो...

रबराची ती लाकडाची ती 
          सोंगटी खरी 
माझीच व्यथा ही 
          सांगते भली बुरी 
मी एक सोंगटी या घरात 
          ती एक सोंगटी त्या घरात 
कामाची यादी मनातल्या मनात 
          नाचत असतो माजघरात ||
टाकूनी मज नोकरीच्या घरात 
          म्हणे तुमची मजा ऑफ़िसात 
लवकर येताच पडते पाळणाघरात 
          बाब्याचा पापा घेउन येते दारात ||
तेव्हा तू असतोस थिएटरात 
          कारण तू तर नाही सोंगटीच्या खेळात 
फ़ासा तर फ़ासा टाकतोस तरी 
          खेळतोस मात्र चिटिंग भारी ||
समजून घे ना सोंगटीच्या मालका 
          शेवटच्या घरात माझाच दणका 
विजय माझा पचेल का? 
          आता तरी सोंगटीला जपशील का ? 


Saturday, 2 May 2015

बापाचे नातं सांगणार्‍या पुरुषा...

बापाचे नातं सांगणार्‍या पुरुषा, 
तुझ्यातला कावा कळतो काहींना. 
वयातील दरी हाच मोठा धोका, 
बापाचं नातं लावून साधतोस मोका. 
पाठीवर ,खांद्यावर हात ठेवतोस पुन्हा, 
चाचपडत असतोस आतल्या खुणा. 
बापाने माझ्या मी वयात आल्यावर 
कधीच नाही हात ठेवला हातावर. 
बापाचं नातं सांगुन मिठी मारतोस कधी, 
तेव्हा,
 घाणेरड्या वासाची उलटी विरघळते तोंडामधी. 
मिचमिचत्या डोळ्याने कोपरा पकडून
 मुलींची लगबग पाहत, पाहत येतोस मागून. 
पुढे येताच, देतोस जोरकस धक्का 
म्हणतो वय झालं 
पण साधतो मोका.