Wednesday, 29 April 2015

मी त्याची भाकर...

   तो फकस्त तोंडी लावणा 
       मी त्याची भाकर 
   सकाळ पासुन कामाची 
        वाहून जाते घागर 
   दादला माझा कुंकवाचा 
        आयाबायांसाठी मिरवायचा 
   गाठीच्या लुगड्याला घेउन 
        तो मात्र सुटायचा 
    भाकरीसाठी जुंधळं 
        जुंधळ्यासाठी हिरवं शेतं 
    शेताचा त्यो मालक 
        माझे घेतो दोन हात 
    माझ्य़ातला राग राग 
        दबत नसतो काही 
    शेतात हात घातला 
        मातीच वेदना साही 
    घरला याची भेंडोळी 
        पोरांच्या पुढ्यात 
    बुजगावणं तरी बरं 
        उपयोग त्याचा शेतात 
    काय सांगू तोंडी लावणा 
        मी त्याची भाकर 
    घरात आता काय नाय 
        आहे पोरांची पाखर.



Tuesday, 28 April 2015

बाई आहे बाईच राहीन...

बाई आहे बाईच राहीन
           पुढचा जन्म बाईचा लेईन.
समजून घेईन मनाची जागा, 
           संवादाचा जोडीन सांधा.
गुंतत जातो गुंत्यांचा पुंजका, 
            हातात घेऊन 
            एक एक करीत सोडवत नेईन.
इच्छांच्या पिशवीला 
            वेळीच शिवीन बंद, 
            नकोत आता मला नात्यात निर्बंध.
बाई आहे बाईच राहीन.
संकटाचे पैंजण पायात घालीन,
            नाद त्यांचा ऐकत 
            तळव्यावर नाचवीन.
 बाई आहे बाईच राहीन. 
अन्यायाच्या फुलांचा  
            डोक्यात वर्षाव -
            लिखा समजून चिरडून टाकीन. 
बाई आहे बाईच राहीन. 
ढालीत मी स्वतःला बघेन. 
            वेळ आली की ढालच होईन.
बाई आहे बाईच राहीन.

दादरा मी पुसता पुसता...

फराफरा बादली, पुढ्यात घेऊन,
जमीन पुसली वाकून, 
का करते मी ही कामं ?
शिकली नाही म्हनून.
लेक जिथे शिकते, 
त्याचा दादरा वाकुन पुसते.
वंगाळ नाही वाटत तिला - 
"ही माझी आई" सर्व्यांना सांगते.
 मलाच तवा भरुन येते, 
मग तिची मैतरीन होते,
दोन दादरे अधिक पुसते. 
येता जाता सर्वे देतात मला मान,
लेकीचा पैला नंबर ताठ माझी मान. 
हळूच तिच्या पायाखालची जमीन पुसते,
डोळ्यातलं पानी लपवत, 
कमरेत मी वाकत असते !